विक्रेत्यांविरोधात उठाव : चार महिन्यांपासून दारूविक्रीमुक्त गाव

92

-महिला , ग्रापं व मुक्तिपथच्या प्रयत्नांना यश
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : चामोर्शी तालुक्यातील फोकुर्डी या १० ते १२ विक्रेते असलेल्या गावातून अवैध दारू हद्दपार करण्याचे मोठे आवाहन उभे ठाकले होते. परंतु, मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत समिती व ग्रामस्थांनी आपल्या गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी उठाव करून दारूविक्रेत्यांवर पोलिस कारवाई केली. आता मागील चार वर्षांपासून या गावाने दारूविक्रीमुक्त गाव म्हणून नवीन ओळख प्राप्त केली आहे.
फोकुर्डी हे गाव तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर आहे. या गावात १०-१२ संख्येने असलेले विक्रेते दारूविक्री करून गावातील शांतता व सुव्यवस्था खिळखिळी करीत होते. परंतु, गावातील दारूविक्री बंदीसाठी कुणीही पुढे येत नव्हते. परिणामी आर्थिक, सामाजिक व आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. अशातच मुक्तिपथच्या टीमने गावाला भेट देऊन सद्यस्थिती जाणून घेतली. त्यानंतर बैठक घेऊन उपसंघटक आनंद सिडाम यांनी ग्रामस्थांना दारूचे दुष्परिणाम समजावून सांगितले. ग्रामसभेचे आयोजन करून दारूविक्री बंद कसे करायचे याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार दारूबंदीचा ठराव पारित करून विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आले. त्यानंतर अहिसंक कृती करून पाच विक्रेत्यांवर पोलिस विभागाच्या माध्यमातून कारवाई देखील करण्यात आली.
गावातील महिला व ग्रामस्थांनी दारूविक्रेत्यांना धडा शिकवून आपल्या गावाला दारूविक्रीच्या संकटातून वाचविले. आता सलग चार महिन्यांपासून गाव दारूविक्रीमुक्त असून ही दारूबंदी कायम टिकवून ठेवण्यासाठी गाव संघटनेला ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे. पूर्वी अवैध दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या गावाला महिलांनी स्वबळावर दारूविक्रीमुक्त गाव म्हणून नवीन ओळख मिळवून दिली. यासाठी सरपंच चेतनामाला रोहणकर, भावना गाळमोडे, तुमदेव दहेलकर, ग्रापं सदस्य जयश्री पाल, शिला गोहणे, आशा गोहणे, प्रतिभा तुमडे, रेखा तुमडे, छाया झाडे, शैला राऊत, शारदा झाडे, उर्मिला उरकुडे, हिना पाल, माधुरी झाडे, प्रतिभा झाडे, रंजना पाल, मुक्ता शेंडे, कुसुम नंदगिरवार, माया शेंडे, कुसुम तुमडे, चेतना शेंडे, रेखा कोरडे यांच्यासह महिला व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here