ताडोबा जंगल सफारीसाठी जाणाऱ्या वाहनाचा अपघात : चार जखमी

55

– अपघातात चार जण जखमी, वनविभागाकडून वाहन जप्त, गुन्हा दाखल
The गडविश्व
चंद्रपूर, दि. १९ : ताडोबा बफर झोनमधील गोंडमोहाळी फाट्याजवळ शनिवार दि. १९ एप्रिल रोजी सकाळी जंगल सफारीच्या आनंदात दंग असलेल्या पर्यटकांचा थरारक अपघात घडला. रस्त्यावर अचानक आडवे आलेल्या जंगली डुकराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनाने रानडुकराला जोरदार धडक दिल्यानंतर ते थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या पळसाच्या झाडावर आदळले.
या अपघातात योगेश कमलिया (३३) या पर्यटकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, दीक्षा जया शेट्टी (३४), धीरज हेगडे (३२) आणि नमिता छाभरा (३४) हे तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. सर्वजण मुंबईचे रहिवासी असून, जंगल सफारीसाठी खासगी वाहनाने आले होते.
जखमींना तत्काळ चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, धडक एवढी जबरदस्त होती की रानडुक्कराचा जागीच मृत्यू झाला.
मुंबईहून आलेले हे पर्यटक शिरकाळा बफर क्षेत्रातील सफारीसाठी निघाले असताना गोंडमोहाळी फाट्याजवळ ही घटना घडली. अपघातग्रस्त वाहन क्रमांक एचएच ४८ एटी ०५६६ हे पर्यटकांनी स्वतः चालवले होते.
या प्रकरणी वनविभागाने वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २(१६)(सी)(९) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, संबंधित वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.
जंगल सफारी करताना वाहतूक नियमांचे पालन, तसेच वन्य प्राण्यांप्रती संवेदनशीलता ठेवणे आवश्यक असल्याचा इशाराही वनविभागाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here