The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : बेकायदेशीर लोहखाणींचा विरोध करणाऱ्या आणि अन्याय, अत्याचाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या आदिवासींना नक्षलवादी ठरविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, तुम्ही किती लोकांवर गोळ्या झाडणार आहात, असा सवाल करीत आज शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी अन्याय, अत्याचाराच्या विरोधात आम्ही लढत राहू, असा निर्धार व्यक्त केला.
प्रागतिक पक्षांच्या महाराष्ट्र आघाडीतर्फे आज गडचिरोली येथील अभिनव लॉनवर आयोजित उलगुलान सभेत ते बोलत होते. ज्येष्ठ भाकप नेते कॉ.तुकाराम भस्मे, शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हरीश उईके, जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी, भाकप नेते डॉ.महेश कोपुलवार, माकप नेते कॉ.अमोल मारकवार, कॉ.देवराव चवळे, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवीण खोब्रागडे, रोहिदास राऊत, अशोक निमगडे, बीआरएसपीचे प्रदेश सचिव विजय श्रुंगारे, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, शेकापच्या महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, शिला गोटा उपस्थित होते.
आदिवासींनीच जल, जंगल आणि जमिनीचे रक्षण केल्याने तोच नैसर्गिक संसाधनांचा मालक आहे. परंतु कुठलाही प्रकल्प उभारताना किमान ३५ टक्के जंगल राखीव ठेवण्याचे बंधन संयुक्त राष्ट्रसंघ आणि जागतिक बँकेने घालून दिले असताना गडचिरोली जिल्ह्यात बेकायदेशीर लोहखाणी निर्माण केल्या जात आहेत. शिवाय या माध्यमातून आदिवासींचे उपजीविकेचे साधन हिरावले जात आहे. मात्र, या विरोधात आवाज उठविणाऱ्या आदिवासींना नक्षलवादी ठरविले जाते. हे आता खपवून घेणार नाही, असा इशारा आ.जयंत पाटील यांनी दिला. आदिवासी, दलित आणि ओबीसींच्या समस्या आपण विधिमंडळात मांडू, असेही त्यांनी सांगितले.
भाकप नेते कॉ.तुकाराम भस्मे म्हणाले की, पीक विमा कंपन्या हजारो कोटींनी शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. परंतु सरकारचे त्याकडे लक्ष नाही. हे सरकार भांडवलदारांची बाजू घेणारे सरकार असून,ते गोरगरिबांची बाजू घेईल, या भ्रमात राहायला नको.सरकार हीच आमची समस्या झाली आहे, अशी टीका भस्मे यांनी केली.
याप्रसंगी शेकाप नेते रामदास जराते, भाकप नेते डॉ.महेश कोपुलवार, माकप नेते अमोल मारकवार, रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रवीण खोब्रागडे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नेते हरीश उईके यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन हेमंत डोर्लीकर तर आभार विनोद मडावी यांनी मानले.
महामोर्चाला परवानगी नाकारली, तरीही सभेला गर्दी
प्रागतिक पक्षांच्या आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर उलगुलान महामोर्चा काढण्यात येणार होता. परंतु प्रशासनाने या महामोर्चाला परवानगी नाकारुन केवळ सभेला परवानगी दिली. असे असतानाही ठिकठिकाणातून शेकडो महिला आणि पुरुषांनी सभेला हजेरी लावली होती.