खदान विरोधी संघर्षात ‘पद्मश्रीं’ चा सहभाग का नाही?

867

– सुरजागडच्या यात्रेत उपस्थितांचा सवाल
The गडविश्व
गडचिरोली-एटापल्ली, दि.१० : आदिवासींची सेवा केल्याच्या नावाखाली ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळालेले व्यक्तीमत्व जिल्ह्यात असूनही आदिवासींचे अस्तित्व नष्ट करु पाहणाऱ्या लोह खदानींच्या विरोधातील संघर्षात या ‘पद्मश्रीं’ नी आजपर्यंत का सहभाग घेतला नाही. असा सवाल सुरजागड इलाख्यातील कार्यकर्त्यांनी देवाजी तोफा यांना केला. ठाकुरदेव यात्रेदरम्यान झालेल्या अधिकार संम्मेलनाच्या समारोपादरम्यान देवाजी तोफा यांनी भेट दिली होती.
५ ते ७ जानेवारी ला संपन्न झालेल्या ठाकुरदेव यात्रेदरम्यान ६ जानेवारीला अधिकार संम्मेलन पार पडले यावेळी जिल्ह्यातील बेकायदेशीर लोहखाणी आणि त्या खाणी खोदण्यासाठी स्थानिक आदिवासींचे होणारे दमन याविरोधातील आंदोलनात सहभागी असलेल्या प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीच्या नेत्यांनी यात्रेतील जनतेला मार्गदर्शन केले. सभेच्या अध्यक्षस्थानी सुरजागड इलाखा प्रमुख सैनू गोटा तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते काॅ.डॉ. महेश कोपूलवार, काॅ. अरुण वनकर, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनोद मडावी, माजी पं.स.सदस्य शिलाताई गोटा, जयश्रीताई वेळदा, शामसुंदर उराडे, अक्षय कोसनकर, भाकप जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, ॲड.जगदिश मेश्राम, विनोद झोडगे, मिलिंद भनारे, आप चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, साहित्यिक कुसूम आलाम प्रामुख्याने उपस्थित होते.रविवार ७ जानेवारीला यात्रेचे समारोप प्रसंगी आदिवासी समाज सेवक देवाजी तोफा यांनी भेट दिली असता त्यांचेसोबत सुरजागड इलाख्यात कार्यकर्त्यांनी चर्चासत्र घडवून आणून जिल्ह्यातील ‘पद्मश्री’ आणि प्रशासना बद्दल तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. तसेच जे आमच्या संघर्षात नाही, आम्हीही त्यांच्या सोबत नाही. अशी भूमिका घेत डॉ. अभय बंग यांच्या दारुबंदी आणि दारुनिर्मिती कारखाना विरोधी भूमिकेला धुत्कारण्यात आले. उल्लेखनीय की, यावर्षी लोह खदानी संबंधात विरोधाची स्पष्ट भूमिका नसणाऱ्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना अधिकार संम्मेलनाच्या मंचावर स्थान नाकारण्यात आले.
ठाकुरदेव यात्रा आणि पारंपरिक अधिकार संम्मेलनाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मण नवडी, मंगेश होळी, पत्तू पोटावी, सैनू हिचामी, रमेश कवडो, सरपंच करुणा सडमेक, माजी सरपंच कल्पना आलाम, दारसू तिम्मा, शिवाजी गोटा व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here