जोगणा येथील दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी महिला सक्रिय
-मुक्तिपथचे मार्गदर्शन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : चामोर्शी तालुक्यातील जोगणा गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी मुक्तीपथच्या मार्गदर्शनाखाली गावातील महिलांनी विशेष परिश्रम घेऊन गावाला दारुमुक्त केले. आता गावात मागील वर्षभरापासून अवैध दारूविक्री बंद असून ही दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी महिला व ग्रामस्थांच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत.
जोगणा हे गाव दारू विक्रीचे कुप्रसिद्ध गाव ओळखले जात होते. या गावात शेजारी पाच गावातील लोक दारू पिण्यास गर्दी करायचे. यामुळे शाळेतील मुले, मुली व महिलांना स्वतंत्रपणे शाळेत किंवा शेतात ये-जा करणे कठीण झाले होते. व्यसनी लोक दारूच्या नशेत चौकात उभे राहून अश्लील शब्दात ओरडत असत, यामुळे खूप त्रास सहन करावा लागत होता. अशातच गावातील युवकांनी पुढे येऊन गावातील अवैध दारूविक्री बंद केली होती. परंतु, गावातील काही युवक शिक्षण व नोकरीसाठी बाहेर जाऊन राहू लागले. यामुळे गावातील युवकांची संघटना कमकुवत झाली. या संधीचे सोने करीत गावातील दारूविक्रेत्यानी पुन्हा २०२२ मध्ये अवैध दारूविक्री सुरु केली. दोन दारूविक्रेत्यांऐवजी गावात विक्रेत्यांची संख्या सहा एवढी झाली. परत गावात पूर्वी प्रमाणे दारू विक्री सुरु झाली. दरम्यान, २६ सप्टेंबर रोजी गावात सघन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष महिला ग्रामसभा घेण्यात आले. यामध्ये महिलांना सविस्तर दारूचे दुष्परिणाम मुक्तिपथ तालुका उपसंघटक आनंद सिडाम यांनी समजावून सांगितले. त्यानंतर पुन्हा ग्रामस्थांनी गावातून अवैध दारू हद्दपार करण्याचे ठरविले. यासाठी महिलांची मुक्तिपथ गाव संघटना गठीत करण्यात आली. या संघटनेच्या माध्यमातून गावातील अवैध दारूविक्रेत्यांना नोटीस बजावून अवैध दारूविक्री बंद करण्याची तंबी देण्यात आली. सोबतच दारूविक्रेत्यांकडून हमीपत्र लिहून घेण्यात आले. गावात अवैध दारूविक्री बंदीसाठी गावात वारंवार बैठकीचे आयोजन करून दारूविक्री कायम ठेवण्यासाठी मुक्तिपथ तालुका चमूच्या माध्यमातून उपाययोजना सांगण्यात आल्या. यामुळे सदर गाव वर्षभरापासून दारूविक्रीमुक्त गाव म्हणून नावारूपास आले आहे. विशेष म्हणजे, महिनाभरापूर्वी दोन विक्रेत्यांनी चोरट्या मार्गाने अवैध व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. परंतु, महिला संघटनेने संबंधित विक्रेत्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दोन दारूविक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करून निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असाही इशारा देण्यात आला होता. आताच्या घडीला गावात शांतता व सुव्यवस्था कायम टिकून असून हि दारूबंदी कायम ठेवण्यासाठी गाव संघटनेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )