– पोलीस विभागाला निवेदन सादर करत केली मागणी
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, २१ जून : शहरातील अवैध दारू विक्री विरोधात युवकांनी कंबर कसत अवैध दारू विक्री बंद करण्याकरिता पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदनातून मागणी केली.
कुरखेडा शहरात तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री ला उधाण आले आहे. जिल्हानिर्मिती पासूनच जिल्ह्यात दारूबंदी असतांना शेजारच्या जिल्ह्यातून व राज्यातून छुप्या मार्गाने दारूची वाहतूक करत अवैध दारू विक्री केल्या जात आहे. असे असतांना उघडपणे अवैध दारूविक्री होत असल्याने येथील युवक वर्ग दारूच्या आहारी जात असल्याचे चित्र असून ते भयाण आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कुरखेडा शहरात दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये दारू ही प्रमुख कारण असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गावातील सामाजिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी अवैध दारू तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी युवकांनी निवेदनातून केली आहे.
सदर मागणीचे निवेदन नगर पंचायत कुरखेडा येथील पाणी पुरवठा व जलनिस्सरण सभापती जयेंद्रसिंह चंदेल यांनी पुढाकार घेत पोलिस विभाग सोबत चर्चा करून देण्यात आले. तसेच या निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक यांना सुद्धा सादर करण्यात आली आहे. निवेदन देताना नगरपंचायत चे पाणीपुरवठा सभापती जयेंद्रसिंग चंदेल, स्वच्छता सभापती अतुल झोडे, नगरसेवक सागर निरंकारी, ताहेर शेख, शहेजाद हाशमी, चेतन मैंद, सुरज जांभुळकर, प्रीतम वालदे, दीपक धारगाये, साहिल साहारे, बालवीर बोदेले, भीमराव वालदे, प्रकाश चौधरी, साईनाथ कोंडवार आदी उपस्थित होते.